अक्कलकोट
श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणुन अक्कलकोट प्रसिध्द आहे. अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून ३८ कि मी अंतरावर वसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. श्री स्वामी समर्थांची समाधी भक्ताकडून पुजली जाते. दर वर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जाते. राज्यातून व पर राज्यातून मोठ्या संख्येने भक्त गण नित्य नेमाने भेट देतात.
सध्याचे स्वामी समर्थ मंदिर हे एका वडाच्या झाडाच्या भोवती बांधले आहे. ह्याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ ध्यान धारणा करीत व भक्तांना उपदेश देत असत. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिर, सभा मंटप व भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्नछत्रामध्ये रोज दुपारी व रात्री मोफत भोजनाची (प्रसादाची) व्यवस्था करण्यात आलेली आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज हे शके १७७९ च्या सुरुवातीला अक्कलकोट येथे आले. श्री दत्तात्रयाचे चौथे अवतार मानले गेलेल्या श्री स्वामी समर्थांचा एकूण कार्यकाळ ४० वर्षाचा आहे त्यापैकी २१ वर्षे त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे होते.
इतिहासकारांच्या मते श्री स्वामी समर्थांचे अवतार कार्य शके १८०० मध्ये संपन्न झाले. पण तीन महिन्यानंतर स्वामी समर्थ काशी (वाराणशी) येथे प्रकट झाले. श्री स्वामी समर्थांची पवित्र समाधी त्यांचे शिष्य श्री चोळप्पा ह्यांचा घरात आहे. हे ठिकाण समाधीमठ असे ओळखले जाते. भक्तांना संकट प्रसंगी धीर व मानसिक बळ देणारे “भिऊ नकोस – मी तुझ्या पाठीशी आहे” हे घोष वाक्य श्री स्वामी सामार्थांचेच आहे.
कसे पोहोचाल?:
विमानाने
जवळचे विमानतळ - पुणे.
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्थानक अक्कलकोट रोड. रेल्वेच्या सोलापूर-वाडी मार्गावर आहे. अक्कलकोट, शहर रेल्वे स्थानकापासुन 11 कि.मी.
रस्त्याने
सोलापूरपासुनचे अंतर 40 कि.मी.